नवी दिल्ली : 2023-24 या आर्थिक वर्षात 1.25 लाखांहून अधिक लोकांना रोजगार दिला जाईल, असे टीसीएसने (TCS) म्हटले आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 2,197 ने कमी होऊन 6.13 लाख झाली.
कंपनीचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन म्हणाले की, जर तुम्ही आमचा एकूण भरतीचा ट्रेंड बघितला तर आम्ही जवळपास समान स्तरावर नियुक्ती करत आहोत. पुढील आर्थिक वर्षात 1,25,000 ते 1,50,000 लोकांची भरती करावी लागेल. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीने 1.03 लाख नवीन लोकांना रोजगार दिला आणि ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 2,197 लोकांची कपात करूनही 2023 आर्थिक वर्षात आतापर्यंत सुमारे 55,000 लोकांची भरती केली आहे.
कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड म्हणाले की, 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 42,000 नवीन लोकांची भरती करण्यात आली आहे. तसेच, मिलिंद लक्कड यांनी डिसेंबर तिमाहीतील घसरणीसाठी नवीन भरतीऐवजी नोकरी सोडणे, याला जबाबदार ठरवले आहे. ते पुढे म्हणाले की, कंपनीने आर्थिक वर्ष 23 मध्ये आतापर्यंत 42,000 फ्रेशर्सची नियुक्ती केली आहे, याचा अर्थ तिसऱ्या तिमाहीत जवळपास 7,000 कर्मचारी नियुक्त केले, जे पहिल्या सहामाहीत 35,000 होते. ते चौथ्या तिमाहीत काही हजार आणखी नियुक्त केले जाऊ शकतात.
याचबरोबर, आर्थिक वर्ष 24 मध्ये सुमारे 40,000 फ्रेशर्सना नियुक्त करण्याचा ट्रेंड चालू ठेवला जाईल. 5 लाखांहून अधिक तरुणांनी भरतीसाठी अर्ज केले आहेत, असे कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी सांगितले. तसेच, संख्येत घट हे मागणीच्या वातावरणामुळे नाही आणि मुख्यत्वे भूतकाळातील अधिक भरतीमुळे आहे, असेही मिलिंद लक्कड म्हणाले.