मुंबई : उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये जनादेशाची हत्या केली आहे. रात्रंदिवस युतीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास तोडण्याचे काम केले. त्यांनी माझ्या नव्हे, तर भाजपच्या पाठीत खंजिर खुपसला. मात्र, असा अन्याय ज्या-ज्या वेळी होईल, त्या-त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
भाजपच्या वतीने आयोजित मिशन 2024 पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 2019 मध्ये युती तुटण्यामागील कारणे सांगत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तर आता नव्याने शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या युतीवर कौतुकाचा वर्षात करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी देखील केलेल्या युतीमागील निती सर्वांसमोर माडंली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2019 साली भाजप-सेनेचे पूर्ण बहुमत आले होते. पण त्यावेळी काही लोकांनी त्यात खडा टाकला. आता काही लोक खोट्या शपथा घेत आहेत. उद्धव ठाकरे पोहरादेवीला जाऊन खोटी शपथ घेतली. तेव्हा त्यांनी देखील देवीपुढे मनातल्या मनात माफी मागितली असेल. कारण ते आता हतबल झाले आहेत.
फडणवीस पुढे म्हणाले की, 2019 मध्ये आम्ही युतीची बोलणी अंतिम टप्प्यात होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री पदाची मागणी करण्यात आली. तेव्हा मी रात्री एक वाजता अमित शहांना फोन करून विचारणा केली. तेव्हा त्यांनी अगदी स्पष्ट सांगितले की, मुख्यमंत्री पद मिळणार नाही. तेव्हा त्यांनी उद्धवजी यांनी युती होणार नसल्याचे स्पष्ट केले आणि संवाद संपला. पण पुन्हा तीन दिवसाने एक मध्यस्त बोलायला आला. त्यांचे म्हणणे पालघरची जागा आम्हाला मिळाली पाहिजे. तेव्हा आम्ही उमेदवारासह त्यांना पालघरची जागा दिली. कारण आम्हाला 25 वर्षांची युती तोडायची नव्हती.