मॉस्को : रशिया आणि युक्रेन दरम्यान आता प्रत्यक्ष युद्धाला सुरूवात झाल्यामुळे जगाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झालीआहे . रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी गुरुवारी सकाळी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर रशियाकडून युक्रेनची राजधानी ‘कीव’वर हल्ला चढवण्यात आला आहे. या हल्ल्यात युक्रेनचा एअरबेस आणि एअर डिफेन्स उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला असून यामध्ये अनेक सैनिक ठार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान रशियाच्या हल्ल्याला युक्रेन घाबरणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी जी-७ ची बैठक बोलावली आहे. जी-७ मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या देशांचा समावेश आहे. ‘आम्ही जी-७ च्या नेत्यांशी संवाद साधला आहे. त्यानंतर आम्ही या जी-७ ची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला असून आम्ही रविवारी जर्मन संसदेसोबत बैठक घ्यायाचाही निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.
युक्रेनकडे जाणारी सर्व उड्डाणे रद्द
दरम्यान युक्रेनला जाणारी सर्व विशेष उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे.दरम्यान युक्रेनमध्ये २० हजाराहून अधिक भारतीय अडकले असून यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश अधिक आहे . राजदूताने असेही स्पष्ट केले आहे कि , युक्रेनकडे जाणारी सर्व विशेष उड्डाणे रद्द करण्यात आली असली तरी इथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे त्यामुळे सर्वांनी संयम राखावा.
युक्रेनवर एकाच दिवसात दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र हल्ला
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशावर एकाच दिवसाच दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र हल्ला घडवून आणण्यात आला आहे. गुरुवारी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना माहिती देताना सल्लागारांकडून ही माहिती देण्यात आली. युक्रेनवर पुन्हा एकदा क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिला क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल्याची माहिती कीवमधील अधिकाऱ्यांनी दिली होती.
दरम्यान कीवमध्ये निर्माण झालेल्या युद्धपरिस्थितीत युक्रेन लष्कराने मोठा दावा केला आहे. युक्रेनमधील श्चास्त्य शहर सध्या युक्रेनच्या ताब्यात आहे. या भागात सध्या ५० रशियन सैनिक ठार झाल्याचे युक्रेन लष्कराने म्हटले आहे. याशिवाय रशियाचे सहावे विमानही खाली पाडण्यात युक्रेनला यश मिळाले असल्याचेही लष्कराने म्हटले आहे.
मोदींना हस्तक्षेप करण्याची मागणी
रशिया आणि भारताचे दशकांपूर्वीपासूनचे जुने आणि मजबूत संबंध तसंच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी पंतप्रधान मोदींची जवळीक पाहता, हे युद्ध थांबवण्यासाठी मोदींनी पुढे यावे , अशी इच्छा युक्रेनने व्यक्त केलीय. संकटाच्या या प्रसंगी युक्रेनने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या युद्धपरिस्थितीत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
महाभारताची करून दिली आठवण
‘महाभारताचं स्मरण करा. ही लढाई जवळपास इसवी सन पूर्व ३१०२ वर्षांपूर्वी लढली गेली होती. महाभारताच्या युद्धापूर्वीही शांततेसाठी अनेक प्रयत्न करण्यात आले होते. दुर्दैवाने महाभारतातील शांततेसाठीचे ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, परंतु मला आशा आहे की या परिस्थितीत अशा पद्धतीची चर्चा यशस्वी ठरू शकेल’ असे युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी म्हटले आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही…
नवी दिल्लीतील युक्रेनच्या राजदूतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपली ही मागणी मांडली आहे. पुतीन यांच्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख करताना ‘भारताचे रशियाशी वेगळे नाते आहे. आणखीही चर्चेची वेळ गेलेली नाही त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वीच भारत यात हस्तक्षेप करून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आम्ही पीएम मोदींना आवाहन करतो की त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि आमचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात त्वरित चर्चा घडवून आणावी’, असेही युक्रेनच्या भारतातील राजदूतांनी म्हटले आहे.
आमची लष्करी कारवाई : पुतीन
रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असे पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांनी रशियाच्या विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करत असल्याचे सांगितले असून या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
युक्रेनमध्ये मार्शल लॉ जारी
दरम्यान रशियाने युद्धाची घोषणा करताच युक्रेन सरकारने राजधानी कीवमधील विमानतळ रिकामे केले असून प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावरुन हलवण्यात आले आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपला देश पुतीन यांनी पुकारलेल्या युद्धामध्ये आपले रक्षण करेल आणि विजयीदेखील होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मार्शल लॉची घोषणा केली आहे. तसंच रशियाने हल्ला सुरु केला असली तरी घाबरु नका असे आवाहन केले आहे. ‘मार्शल लॉ’ घोषित केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचे हक्क काढून घेत देशाच्या कामकाजावर लष्कराचं नियंत्रण आणले जाते. अनेक शहरांमध्ये धोक्याचे सायरन वाजवत युक्रेनने सतर्कतेचा इशारा दिला असून रशियाशी ताकदीने लढण्याचा निर्धार युक्रेनने केला आहे. त्यानुसार युक्रेन रशियाच्या हवाई हल्ल्यांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. रशियन फायटर जेट्स पाडण्यासाठी युक्रेनच्या संरक्षण दलांकडून जमीनीवरुन मारा केला जात आहे.
जगाचा आवाज रशियाच्या युद्धाविरुद्ध
संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांनी रशियाने पुकारलेल्या युद्धाविरोधात आवाज उठवला असून युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. युरोपमध्ये नवे युद्ध होण्याची भीती असल्याने त्यांनी मध्यस्थीची विनंती केली आहे. महत्वाचे म्हणजे नेहमी रशियाची बाजू घेणाऱ्या चीननेही देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सीमांचा आदर करण्यासंबंधी भाष्य केले असून भारताने रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी आवाहन केलं असून मोठं संकट निर्माण होऊ शकतं असा इशारा दिला आहे.