रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना मंगळवारी रात्री उशिरा जामीन मंजुर झाला आहे. राणेंच्या अटकेनंतर त्यांना महाड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्याता आला. तर, पोलिसांकडून 7 दिवसांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.अखेर नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्यावरून राज्य पेटले असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्र्यांच्या विरोधात रायगड, पुणे, आणि नाशिकसह जळगावात एफआयआर नोंदवण्यात आला होता. याच दरम्यान, राणेंना रत्नागिरीत पोलिसांनी अटक केली. यानंतर नारायण राणे यांना संगमनेर पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. यापूर्वी त्यांना रत्नागिरी कोर्टात हजर करण्यासाठी नेले जात असल्याचे सांगण्यात आले होते.
नारायण राणे यांना अटक करण्यात आली त्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. या दरम्यान पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादही झाला. नारायण राणे यात जेवताना दिसून आले. या घटनेबद्दल भाजप नेते प्रसाद लाड यांनी एक ट्विट देखील केले आहे.