केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक होणार?; पुणे पोलिसांचे पथक चिपळूणला रवाना
राज्यात शिवसेना आक्रमक; दगडफेक, पुतळा जाळणे, काळे फासण्याचे प्रकार
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनआशिर्वाद यात्रेदरम्यान वादग्रस्त विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुण्यासह नाशिक, महाड येथे राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पुणे व नाशिक पोलिसांचे पथक चिपळूणला रवाना झाले आहे. त्यामुळे पोलीस राणे यांना अटक करतात की ते अटक टाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रेला चिपळूणमधून सुरुवात होत आहे.
पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे सरचिटणीस रोहित कदम यांनी याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यांचा तपास सुरु करण्यात आला असून रात्री उशिरा पुणे पोलिसांचे एक पथक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिली. दरम्यान, नाशिक शहरातही नारायण राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फिर्याद दिली असून नाशिक पोलिसांचे पथकही चिपळूणला रवाना झाले आहे. त्यामुळे आज दिवसभर राजकारणाचे केंद्र बिंदु चिपळूण राहणार आहे.
राणे यांच्या वक्तव्यानंतर राज्यात त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी भाकपच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आलेली आहे. राणेंचा पुतळा जाळण्यात आला असून त्यांच्या फोटोवर शाई फेकण्यात आलेली आहे. यामुळे राज्यात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.