नाशिक : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, खळबळजनक विधान केल्याचं समोर आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं आहे. रायगडमधील महाड येथे आज केंद्रीयमंत्री राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहचली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणेंकडून असं खळबळजनक विधान करण्यात आलं आहे. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती.” असं राणे म्हणाले. या प्रकरणी नाशिक पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
“महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखा पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिका तरी आहे का? बाजूला एखाद सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे.” असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
तसेच, तेल शुध्दीकरणाचा प्रकल्प कोकणातच व्हायला हवा असे मत केंद्रीय लघु सुक्ष्म मंत्री नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केले. ठेकेदारांच्या निष्क्रीयतेमुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याचा दावाही त्यांनी केला. पूरग्रस्तांना अद्यापही मदत मिळाली नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे वातावरण तापले आहे. सध्या ते चिपळूण मध्ये असून त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. राणे यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.