मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग 2022 परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत ठाण्यातील श्रीनगर परिसरात राहणाऱ्या कश्मिरा किशोर संखे हिने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्यांच्या यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. त्या स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत.
कश्मिरा संखे हिने यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच उराशी बाळगले होते. डॉक्टरी पेशा सांभाळत रुग्णसेवा करत यूपीएससीचा अभ्यास सुरु ठेवला होता. या परीक्षेत तिने घवघवीत यश मिळवले असून राज्यातून प्रथम तर देशातून 25 वा क्रमांक मिळवला आहे.
कश्मिराने तिसऱ्या प्रयत्नात हे यश प्राप्त केले आहे. तिचे पहिले प्राधान्य ‘आयएएस’ तर दुसरे प्राधान्य ‘आयएफएस’साठी होत आहे. वंजारी समाजातील ती पहिली महिला आयएएस ठरली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) UPSC नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार आपला निकाल अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहू शकतात. या परीक्षेत टॉप 4 मध्ये मुली पुढे आहेत, त्यापैकी इशिता किशोरने अव्वल स्थान मिळवले आहे.
दुसरा क्रमांक गरिमा लोहियाने तर तिसरा क्रमांक उमा हरती एन हिने पटकावला. स्मृती मिश्रा चौथ्या आणि गेहाना नव्या जेम्स पाचव्या स्थानावर आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर साधारण 15 दिवसांनी उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील.