सीबीआय, ईडी यांचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी

0

कोल्हापूर : कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केला. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा आहे. ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित 25 हजार कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याचसंदर्भात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीची ही कारवाई अजित पवारांसाठी मोठा धक्का मानली जात आहे. हा कारखाना राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा आहे. घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

आता याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याबाबत भाष्य केलं आहे. जरंडेश्वर प्रमाणे इतर ४३ कारखान्यांवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी ईडीकडे केली असून सध्याच्या कारवाईमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप देखील केला आहे.

‘मी अनेक दिवसांपासून सांगत आहे की, सीबीआय, ईडी या केंद्राच्या हातात आहेत. त्याचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो आहे. केवळ जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई करून भागणार नाही. 43 कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे. कारण, हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडा टाकला आहे. ईडीकडे 5 वर्षे फेऱ्या मारल्या. 43 कारखान्यांची यादी हवी असेल तर पुन्हा देतो,’ असं शेट्टी म्हणाले.

तर, ‘राजकीय फायद्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्यांना भाजपात घ्यायचे, ही पद्धत चूक आहे. ईडी एकप्रकारे राजकीय दृष्ट्या काम करत आहे. अनेकदा मी ईडीकडे खेटे घातले. 5 वर्षांपूर्वी पुरावे दिले होते. मात्र, आता ही कारवाई करण्यात आली! याचा अर्थ ईडीला कुणीतरी सांगत आहे, अमूक अमूक माणूस त्रासदायक ठरतो, म्हणून त्याचा काटा काढायचा आहे,’ असा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला आहे.

kolhapur
Leave A Reply

Your email address will not be published.