ब्रिटन : करोनाने जगात कहर केला आहे. अनेक देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहे. या लाटेत लहान मुले सर्वाधिक बाधित होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लशीकरणाचा देखील विचार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी Pfizer लशीला मंजूरी मिळाली आहे.
ब्रिटनने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी Pfizer-BioNTech द्वारे बनवलेल्या कोरोना लस वापरण्यास मान्यता दिली आहे. ब्रिटनच्या ड्रग रेग्युलेटरने शुक्रवारी सांगितले की, सखोल आढावा घेतल्यानंतर असे आढळले की Pfizer-BioNTech ची लस १२-१५ वर्षांच्या किशोरवयीन मुलांसाठी सुरक्षित आहे.
मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीचे प्रमुख जून रेने म्हणाले, “आम्ही १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमधील क्लिनिकल चाचण्यांविषयीच्या डेटाचे काळजीपूर्वक परीक्षण केले आणि Pfizer-BioNTech सुरक्षित तसेच उपयुक्त असल्याचे आम्हाला आढळले. या व्यतिरिक्त या लसीचे बरेच फायदे आहेत आणि कोणताही धोका नाही.”
भारतामधील करोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेप्रमाणेच अधिक घातक असू शकते. तिसऱ्या लाटेचे देशावर गंभीर परिणाम होतील अशी शक्यता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआयने) नुकत्याच जारी केलेल्या आपल्या अहवालामध्ये व्यक्त केलीय. इतर देशांमध्ये तिसऱ्या लाटेत काय घडलं याचा संदर्भ देत भारतामधील यंत्रणांना या अहवालामधून सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. इकोरॅप नावाच्या या अहवालामध्ये करोना कालावधीत अर्थव्यवस्थेने कशी कामगिरी केली यासंदर्भातही भाष्य करण्यात आलं आहे.