हिंगोली : हिंगोलीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांचा पिकविमा नाकारणाऱ्या कंपनीच्या कार्यालयातच तोडफोड करीत अधिकाऱ्यांना दम दिला. गुरुवारी (ता. 13) ते शेतकऱ्यांसह विमा कार्यालयात आले त्यावेळी हा प्रकार घडला.
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीकडे नुकसानीच्या तक्रारी नोंदविल्या. मात्र विमा, कंपनीने काही तक्रारी मुदतीनंतर आल्या तर काही ठिकाणी अतिवृष्टी झालीच नसल्याचे कारण दिले आणि नुकसानग्रस्तांच्या तक्रारी फेटाळून लावल्या. सुमारे 30 हजारपेक्षा अधिक तक्रारी फेटाळून लावल्यामुळे शेतकरी चांगलेच संतापले होते.
या संदर्भात शेतकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे विमा कंपनीबाबत तक्रार केल्यानंतर आमदार बांगर यांनी या प्रकरणी लक्ष घातले. यात औंढा नागनाथ तालुक्यात विमा कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाच्या अर्जावर आपली स्वाक्षरीच नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे विमा कंपनी उघड्यावर आल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकारानंतर आज दुपारी आमदार संतोष बांगर, युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, पिंटू पतंगे, प्रकाश दराडे, गुड्डू बांगर यांच्यासह शेतकऱ्यांनी थेट विमा कंपनीचे कार्यालय गाठले. यावेळी त्या ठिकाणी कोणीही नव्हते.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आमदार बांगर यांच्यासह कायकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर यावेळी उपस्थित असलेल्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून सर्वेक्षणाचे अर्ज दाखल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार बांगर यांनी केली.
त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी जितेद्र पापळकर यांचीही भेट घेऊन विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात असल्याचे सांगून असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करा तसेच विमा भरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम देण्याबाबत वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करण्याच्या सुचना आमदार बांगर यांनी दिल्या.