महाबळेश्वरच्या एका बंगल्यात सुरु असलेल्या पार्टीवर ग्रामस्थांनी टाकली धाड

0

सातारा : संपूर्ण देश, राज्य कोरोनाच्या महामारीला सामोरे जात आहे. राज्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र याचा फरक काहींना अद्याप पडलेला दिसत नाही. महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड गावच्या हद्दीतील एक बंगल्यात चक्क पार्टी सुरु असल्याचे गावकऱ्यांनी समोर आणले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे.

भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड गावच्या हद्दीतील हमीद हाऊस हा बंगला मालक सागर तराळ यांनी संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश लागू असताना बंगला भाड्याने दिला. कोरोना साथीच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करता गर्दी जमवल्याप्रकरणी तराळ यांच्याविरोधात पांचगणी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस फौजदार अरविंद श्रीरंग माने यांनी गुन्हा दाखल केला आहे.

शासनाने लागू केलेले लॉकडाउनचे कडक नियम लागू केलेले असतानाही हमिदा हाऊस या बंगल्यामध्ये रोज शेकडो लोक बाहेरून येवून राजरोसपणे या ठिकाणी लग्नाची पार्टी करत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. काही ग्रामस्थांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार चालू असताना काही ग्रामस्थ या ठिकाणी धडकले.

जमाव बंदी व जिल्हा बंदी असताना शासनाचे आदेश धुडकावत हे लोक या ठिकाणी आलेच कसे हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. प्रशासनाचा कडक लॉकडाउन असताना बाहेरून या ठिकाणी आलेल्या लोकांमुळे कोरोना प्रसार होऊ शकतो अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. या पार्टीत कुणाच्याही तोंडावर मास्क नव्हता असे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. बाहेरून आलेले धनदांडगे पार्टी करताना आढळून आले. लोकांच्या आरोग्याच्या चिंतेला वाटाण्याच्या अक्षता वाहात असे गैरप्रकार होत असुन संबधितांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

अनेक गावांनी करोना प्रदुर्भाव रोखण्यासाठी गावबंदी केली आहे. गावांच्या सीमा बंद करीत आहेत गावात बाहेरून कुणालाही प्रवेश नाही बंदी आहे असे असताना मुंबई-पुण्याहून हे लोक आलेच कसे, कुणाच्या परवानगी आले अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पाचगणीचे सपोनि सतिश पवार व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.