माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्या अटकेनंतर दक्षिण आफ्रिकेत हिंसाचार; 72 जणांचा मृत्यू

0
आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना अटक केल्यानंतर वातावरण तापले आहे.  या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत किमान 72 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही तणावाचे वातावरण आहे.
सोमवारी (12 जुलै) रात्री दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठी टाऊनशिप असणाऱ्या सोवेटोमधल्या एका शॉपिंग सेंटरमध्ये लुटमार करताना झालेल्या चेंगराचेंगरीत ठार झालेल्या 10 जणांचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या निदर्शनांनी शनिवार – रविवारी (10-11 जुलै) हिंसक वळण घेतलं.
शॉपिंग मॉल पेटवून देण्यात आला आणि दुकांनांची नासधूस करण्यात आली. नासधूस करतानाचे आणि आग लावतानाचे व्हीडिओ दक्षिण आफ्रिकेतल्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी दक्षिण आफ्रिकन सरकारने लष्कराची मदत घेतली आहे. सुरक्षा यंत्रणांनी आतापर्यंत 800 लोकांना अटक केलीय.
ही निदर्शनं म्हणजे 1990नंतरचा दक्षिण आफ्रिकेतला सर्वात भीषण हिंसाचार असल्याचं दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांनी म्हटलंय. लुटमार अशीच सुरू राहिली तर या दंगलग्रस्त भागांमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याचं पोलिस विभागाचे मंत्री भेकी सेले यांनी पत्रकारांना सांगितलं.
Leave A Reply

Your email address will not be published.