मुंबई ः ‘लव्ह जिहाद’ विरोधात काही राज्यांनी कायदे तयार करायला सुरुवात केली आहे. अशा पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे. यामध्ये दिवंगत संगीतकार वाजिद खान यांची पत्नी कमालरुख खान यांनी एक पोस्ट लिहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
लव्ह जिहादवर आपली प्रतिक्रिया देताना कमालरुख खान यांनी स्वतःची लव्हस्टोरी आणि कुंटुंबातील बिघडलेले संबंध यावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. कमालरुख खान म्हणातात की, ”धर्मांतराची चर्चा सुरू झालेली आहे. यावेळी सरकारसुद्धा उत्साहित आहे. माझे नाव कमालरुख खान आहे आणि दिवंगत संगीतकार वाजिद खान यांची पत्नी आहे. वाजिद यांच्यासोबत विवाह करण्यापूर्वी १० वर्षे रिलेशनमध्ये होते. मी पारसी आणि वाजिद मुस्लिम होते. आम्ही विवाह कायद्यानुसार लग्न केले. मी अशा कुटुंबात वाढले की, त्यात लोकशाहीप्रमाणे खुल्या विचारांचे चर्चा करणारे लोक होते.”
कमालरुख खान पुढे म्हणतात की, “असे जरी असले तरी लग्नानंतर घरातील लोकांना स्वातंत्र्य, शिक्षण आणि लोकशाही ही तत्वे अडचणीची वाटायला लागली. त्यांनी महिला स्वातंत्र्याचा स्वीकार केला नाही आणि धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणू लागले. मी सर्व धर्मांचा सन्मान करते. मात्र, हेच धर्मांतर माझ्यात आणि माझ्या पतीमध्ये अंतर वाढवू लागले. इतकंच नाही तर, आमचे नातेदेखील अडचणीत आले. पण, माझ्या स्वाभिमानाने मला धर्मांतर करण्यासाठी परवानगी दिली नाही.”, अशा पद्धत्तीने मला संगीतकार वाजिद खान यांच्या घरातून धर्मांतर करण्यासाठी त्रास दिलेला होता.