पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदौस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात चार दिवस पावसाळी वातावरण तयार होणार आहे.11 ते 14 डिसेंबर या कालावधीत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर राहील.
मंदौस म्हणजे तिजोरी हे नाव संयुक्त अरब राष्ट्राने दिलेले असून, ते 9 डिसेंबर रोजी पाँडेचरी व श्रीहरी कोटा येथील मामल्लापूरमजवळ मध्यरात्री जमिनीवर येणार आहे. याची तीव्रता शुक्रवार ते रविवार (9 ते 11 डिसेंबर) अशी राहील. महाराष्ट्रावर 11 ते 14 डिसेंबरपर्यंत परिणाम राहील. हे चक्रीवादळ गोलाकार फिरत येत असून, वेग ताशी 76 किलोमीटर इतका आहे.
या चक्रीवादळामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे वेगाने येत असून, ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ अपेक्षित आहे. असे वातावरण 15 डिसेंबरपर्यंत राहील. राज्यातील बहुतांश भागात 11 ते 14 डिसेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे.
या चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त जाणवेल, असा अंदाज आहे. तसेच, कोकण, मध्य महाराष्ट्रात देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस राहील. नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचा बहुतांश भाग पार करीत मध्य प्रदेश व पुढे छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर राहील.