आम्ही छत्रपती संभाजीराजे यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत…

0

औरंगाबाद : संभाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून संभाजी ब्रिगेडमध्ये सहभागी व्हावं… आम्ही संभाजी छत्रपती यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडने संभाजी छत्रपती यांना दिलं आहे. शुक्रवारी बीड इथे झालेल्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला असता ‘मला मुख्यमंत्री करा मग प्रश्न विचारा’ असं संभाजी छत्रपती म्हणाले होते. छत्रपतींच्या या वक्तव्याला संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर दिलं आहे.

“बीडच्या कार्यक्रमात आमच्या एका कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजी छत्रपती यांनी मला मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा, असं म्हटलं. मला त्यांना सांगायचंय, की तुम्ही पहिल्यांदा भाजपमधून बाहेर पडा आणि संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”, असं प्रत्युत्तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी छत्रपती संभाजी यांना दिलं.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यंमंत्रीपदावर बसवा, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असे संभाजीराजे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मात्र, यानिमित्ताने संभाजीराजे यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.