…आम्ही अजून रणांगणातच आहोत

0

पिंपरी : कोरोना संक्रमणाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यांना या संकटातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार न थकता, न मागे हटता अहोरात्र प्रयत्न करत आहे. या उलट महापालिकेतील सत्ताधारी मैदान सोडून पळ काढत असल्याची टीका माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.

पालिका प्रशासन आणि सत्ताधारी हतबल झाले असले, तरी आम्ही अजून रणांगण सोडले नाही. या भयंकर संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार, पार्थदादा पवार युवा मंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबध्द आहे. नागरिकांनी धीर धरावा, आपल्याला आपेक्षित सर्व मदत उपलब्ध करण्यासाठी केव्हाही संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून पिंपरी-चिंचवडमध्ये जम्बो कोविड सेंटर सुरू केले. त्याठिकाणी हजारो रुग्णांवर उपचार केले जातात. अशातच आता रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. इंजेक्शन आणि लस पुरवठा केंद्र सरकारच्या नियंत्रणात असल्यामुळे ते वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे असंख्य रुग्णांना वेठीस धरले जात आहे.

रुग्णांचे प्राण जात असताना पालिकेतील सत्ताधा-यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीचा प्रस्ताव जाणिवपूर्वक तहकूब ठेवला आहे. ज्यांना आवश्यकता आहे, अशा रुग्णांना पालिका प्रशासनाकडून इंजेक्शन दिले जात नाही. काही अधिकारी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करण्यात गुंतले आहेत. सत्ताधा-यांचा प्रशासनावर वचक नसल्यामुळे त्यांच्यावर हतबल होण्याची वेळ आली आहे. त्याची कबुलीही त्यांनी दिली असल्याचे लांडे यांनी सांगितले.

पालिका प्रशासन आणि सत्ताधारी हतबल झाले असले, तरी आम्ही अजून रणांगण सोडले नाही.
कोरोनाशी खूणगाठ बांधुनच रणांगणात झुंज देण्याची तयारी आम्ही ठेवली आहे. कारण सत्ताधा-यांनी “बचेंगे तो, और भी लडेंगे” अशी बचावात्मक भूमिका घेऊन नागरिकांना रामभरोसे सोडले आहे. आम्ही नागरिकांना एकटे पडू देणार नाही. प्रत्येक रुग्णासोबत राष्ट्रावादीचा कार्यकर्ता सक्षमपणे उभा आहे. संकटकाळात परिस्थितीवर निर्धाराने कशी मात करायची, याचा धडा आम्ही शरद पवार साहेबांकडून शिकलो आहोत. विलास लांडे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.