मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये समाविष्ट करताना आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही. राष्ट्रवादीमुळे शिंदे गटातील अडचण झाली आहे. अतिरेक झाल्यानंतर स्फोट नक्कीच होईल, अशा शब्दांत माजी मंत्री बच्चू कडू यांनी सत्ताधारी भाजपला इशारा दिला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीला बोलत होते.
अजित पवार यांनी जवळपास 40 आमदारांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. या बंडामुळे अवघ्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीत शरद पवार व अजित पवार असे दोन उभे गट तयार झालेत. त्यातच एनसीपीच्या सरकारमधील समावेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठा असंतोष पसरला आहे. हा असंतोष बच्चू कडू यांच्या विधानातून बाहेर आला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत घेताना त्यावर सल्लामसलत होणे गरजेचे होते. आम्हाला विचारात आणि विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांची अडचण झाली आहे. कारण, मविआ सरकारमध्ये त्यांना राष्ट्रवादीने दिला होता. त्यांचे कामे होत नव्हती. शिवसेनेचे मतदार संघ फोडून त्यांच्या मतदारसंघाची बांधणी केली जात होती, असा आरोप त्यांनी केला होता. मात्र त्या आरोपांना छेद देण्याचा प्रयत्न झाला आहे.