मुंबई : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून जवळपास 30 घरे मातीखाली दबली गेली. या भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 11 जून रोजीच कोकणातील प्रशासनाला दरड कोसळण्याच्या घटनांत वाढ होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर 19 जुलै रोजी रात्रीच इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. राज ठाकरे यांनी आता या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
राज ठाकरे फेसबूकवर याविषयी म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं.
खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की, कुठे दरड कोसळू शकतात याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे यावर सविस्तर बोलेन पण आतातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, मनसेने इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गत महिन्यातील एका भाषणाचा काही भाग आहे. त्यात राज ठाकरे यांनी यंदा कोकणात पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती असल्यामुळे प्रशासनाने सावध रहावे असा सल्ला दिला. त्यांचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.
11 जून 2023 रोजी राज ठाकरे यांनी सांगितले होते की, यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतील असं दिसतंय… शासन-प्रशासनाने जागृत राहावं. आणि 20 जुलै 2-23 रोजी रायगडच्या इरसालवाडीवर मध्यरात्री दरड कोसळणं आणि अख्खं गाव जमीनदोस्त होणं, माणसं दगावणं हे अतिशय वेदनादायी आहे.
महाराष्ट्र सरकारनं अशा नैसर्गिक दुर्घटनेत आपली माणसं मृत्युमुखी पडू नयेत म्हणून उपाययोजना करणं गरजेचं आहे. डोंगरपायथ्याशी असणाऱ्या वाडी-वस्तीचं पुनर्वसन कार्य हाती घ्यावं, पर्यावरण तज्ञांचा सल्ला घेऊन एक ‘पुनर्वसन योजना’ आणि डोंगरपायथ्याशी वस्ती असू नये किंवा बांधली जात असेल तर ती किती अंतरावर असावी याबाबत योजना आखावी, असे मनसेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.