पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकाने, आस्थापना सर्व दिवस पूर्ण वेळ सुरू राहतील. तर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने आणि आस्थापना रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की –
# अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने व आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस पूर्णवेळ सुरू राहतील.
# अत्यावश्यक सेवेची दुकाने व आस्थापना वगळता इतर दुकाने आणि आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्या दुकानांची साप्ताहिक सुट्टी वगळून
# शॉपिंग मॉल लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांसाठी रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. नागरिकांनी दोन डोस पूर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे. शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या कामगार व इतर व्यक्तींची रॅपिड चाचणी प्रत्येक पंधरा दिवसांनी करणे बंधनकारक आहे. कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी माॅल व्यवस्थापनाची राहील.
# रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. घरपोच सेवा रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहील. सर्व रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट इत्यादींना दर्शनी भागावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिलेल्या सूचनांचे स्टिकर लावणे बंधनकारक असेल.
# जलतरण तलाव व निकट संपर्कात येणारे सर्व क्रीडाप्रकार वगळून अन्य इनडोअर व आऊटडोअर खेळ हे नियमितपणे सुरू राहतील.
# सार्वजनिक उद्याने आठवड्यातील सर्व दिवस नियमित वेळेत सुरू ठेवता येतील.
# पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णता बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील.
# स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, क्लासेस हे सर्व दिवस रात्री आठ वाजेपर्यंत आसक क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. या ठिकाणी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे लसीकरण किमान एक डोस अनिवार्य आहे.
# व्यायाम शाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर आसनक्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पूर्वनियोजित वेळेनुसार रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. या ठिकाणी वातानुकूलित एसी सुविधा वापरता येणार नाही.
# सर्व प्रकारची धार्मिक स्थळे राज्य शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
# पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी असेल व रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत अत्यावश्यक कारण वगळता संचारबंदी लागू राहील.
# अन्य निर्बंध पूर्वीप्रमाणे सुरू राहतील.