मुंबई : मी 1977 ला राज्यात वसंतदादांचे सरकार बदलले त्याला भाजपचा म्हणजेच तेव्हाच्या जनसंघाचा पाठिंबा होता. मी सर्वांना सोबत घेऊन सरकार बनवले होते. सरकारमध्ये जनसंघाच्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपद दिले होते. देवेंद्र फडणवीस तेव्हा कदाचित प्राथमिक शाळेत असतील म्हणून त्यांना हा इतिहास माहिती नसेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.
1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. ते काल (ता. 25) चंद्रपूर येथील सभेत बोलत होते.
आज पत्रकार परिषदेत शरद पवारांनी या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. शरद पवार म्हणाले, मी गद्दारी कशी केली, हे फडणवीसांनी सांगावे. 1977ला आम्ही राज्यातील सरकार बदलले होते. त्याला भाजपनेही पाठिंबा दिला होता. फडणवीस त्यांना लहान होते. त्यामुळे त्यांना ही माहिती नसेल.
शरद पवार म्हणाले, आम्ही सर्वांना सोबत घेऊन सरकार बनवले होते. त्यात जनसंघाचे उपमुख्यमंत्री होते. काही सदस्यही होते. आम्ही हे केले तेव्हा देवेंद्र फडणवीस प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना याची माहिती नसेल. म्हणून त्यांनी असे भाष्य केले असेल.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसींना नेतेपदी स्थान दिले जात नाही, असाही आरोप केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, अशी टीका करून ते आपले अज्ञान पुन्हा समोर आणत आहे. छगन भुजबळ, मधूकर पिचड, सुनील तटकरे आदी ओबीसी नेत्यांनी राज्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व केले आहे. ते प्रदेशाध्यक्षपदी राहीले आहेत. आमच्यावर अशी टीका करणाऱ्यांचे वाचन किती आहे, हे मला माहिती नाही. मात्र, ते कोणतीही नोंद न घेताच विधाने करतात. हे आता लोकांनाही माहित झाले आहे. फडणवीसांनी जो प्रश्न उपस्थित केला तो वास्तविकतेला धरून नाही.