प्रियकराच्या मदतीने काढला प्राध्यापक पतीचा काटा

0

यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड येथील भाऊसाहेब माने कृषी विद्यालयातील प्राध्यापक सचिन देशमुख यांचा संशयास्पद मृतदेह दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे आढळला होता. सदर प्राध्यापकाचा खून झाल्याचे शवविच्छेदनातून समोर आले होते. दरम्यान गुरुवारी या प्रकरणी प्राध्यापकाची पत्नी व तीच्या वनपाल असलेल्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल, दिग्रस व उमरखेड पोलिसांनी केली.

वनपाल धनश्री देशमुख ,वनपाल शिवम बचके असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.  वनपाल धनश्री देशमुख यांचे पती प्रा. सचिन वसंतराव देशमुख यांचा मंगळवारी सकाळी पुसद-दिग्रस मार्गावर पुलाखाली संशयास्पद स्थितीत  मृतदेह आढळला होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. प्रा. देशमुख हे शुक्रवारी अकोला जिल्ह्यातील आकोट येथे वनपाल म्हणून नोकरीस असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांचा दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान बुधवारी शवचिकित्सा अहवालातून प्रा.सचिन देशमुख यांचा गळा आवळून खून केल्याचे पुढे आले होते. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रीत केले. तसेच खबऱ्यांच्या माध्यमातून प्राध्यापकांबद्दल माहितीही गोळा केली.

या प्रकरणाचा तपास सायबर टीम, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात येत होता. या पथकाने दिग्रस, उमरखेड आणि आकोट येथे लक्ष केंद्रीत केले होते. शवचिकित्सा अहवालातून गळा आवळून खून झाल्याचे पुढे आल्यानंतर तपास चक्रे गतीमान झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्रस पोलीस, उमरखेड पोलीस, एलसीबीसह सायबर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकोटमधील परतवाडा येथे तपासाला गती दिली.

अखेर अनैतिक संबंधातून सचिनचा खून झाल्याचे पुढे आले. या प्रकरणी वनपाल शिवम चंदन बचके (३३) रा. आकोट आणि प्रा. सचिन देशमुख यांची पत्नी वनपाल धनश्री देशमुख (२८) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर हे करीत आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.