58 व्या वर्षी जिंकले ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक

0
टोकियो : वयातील ज्या टप्प्यावर लोक सेवानिवृत्ती आणि वृद्धापकाळ सुसह्य होण्यासाठी योजना आखत असतात, त्या वयात कुवैतच्या अब्दुल्ला अलरशिदी यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकत जगाला सांगितलं की एज इज जस्ट अ नंबर. सात वेळा ऑलिम्पियन राहिलेल्या अलरशिदी यांनी पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वयाच्या 61व्या वर्षी सुवर्णपदक पटकावणार असे आश्वासनही दिले. असाका शूटिंग रेंजमधील ऑलिम्पिक सूचना सेवेशी बोलताना सांगितले की, मी 58 वर्षांचा आहे. मी सर्वात वयस्कर नेमबाज आहे. सुवर्ण जिंकलो नाही, त्याबाबत मी दुर्दैवी आहे, पण हे कांस्यपदक माझ्यासाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. मी खूप खूश आहे, आणि पुढील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मी सुवर्णपदक जिंकेन.
या स्पर्धेत अमेरिकेच्या व्हिन्सेंट हॅनकॉकने सुवर्णपदक जिंकले आणि तीन सुवर्ण पदके जिंकणारा तो पहिला स्कीट नेमबाज ठरला आहे. असे असले तरी चर्चा झाली ती अलरशिदी यांचीच. अलरशिदी यांनी 1996च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता. रिओ ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्यपदक जिंकले होते, पण त्यावेळी ते स्वतंत्र खेळाडू म्हणून दाखल झाले होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कुवेतवर बंदी घातली होती. त्यावेळी अलरशिदी अर्सेनल फुटबॉल क्लबची जर्सी घालून आले होते.
32 वर्षीय हॅनकॉकनं 60 पैकी 59 गुणांची कमाई केली. डेन्मार्कच्या जेस्पर हॅनसेनला 55 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रिओ ऑलिम्पिकमध्ये हॅनकॉक 15 व्या स्थानावर होता. त्याआधी 2008च्या बीजिंग आणि 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
अलरशिदी यांचा मुलगाही ऑलिम्पिकमध्ये
कुवैतकडून खेळताना पदक जिंकल्यानंतर ते म्हणाले, रिओमधील पदकामुळे मला आनंद झाला, पण कुवेतचा झेंडा न मिळाल्याबद्दल दुःखी झालो होतो. तुम्ही तो समारंभ पाहा, माझे डोके झुकले होते, मी ऑलिम्पिक ध्वज पाहू इच्छित नव्हतो. इथं मी आनंदी आहे, कारण माझ्या देशाचा ध्वज इथं आहे. प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करतो. कारण मी सर्वांसोबत आरामात राहतो. मला प्रत्येकजण आवडतो. मला कुणी नापसंत करावे असे मला वाटत नाही. कारण हे माझं आयुष्य आहे. प्रत्येकाला मी आवडतो, काऱण मी म्हातारा आहे आणि तीन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन.
अलरशिदी यांनी सातव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला आहे. याआधी त्यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलं आहे. तसेच आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहा सुवर्ण आणि तीन रौप्य पदकंही त्यांनी पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांचा मुलगा तलालनेही भाग घेतला आहे. ऑलिम्पिकमध्ये पिता-पुत्राची ही दुसरी जोडी ठरली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.