मुंबई : एवढा मोठा आपला महाराष्ट्र आहे आणि आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री असू नये हे कमीपणाचे वाटते. महाराष्ट्र सरकारला हे शोभत नाही, असे टीकास्त्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजप सरकारवर डागले आहे.
अजित पवार म्हणाले, आजपर्यंत मी जाहीर सभांमधून आणि सभागृहात देखील हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला आहे. मात्र काय अडचण आहे, हे काही कळायला मार्ग नाही. ही गोष्ट आम्हाला आणि महिला वर्गालाही योग्य वाटत नाही.
अजित पवार म्हणाले, 6 ते 9 पर्यंत महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस पडेल, असे सांगण्यात आले होते. गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्षांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काल पाथर्डी दौऱ्यावर असताना रस्त्याने ही परिस्थिती पाहिली. अनेक शेतकरी मला काल भेटले. त्यांनी निवेदने दिली.
अजित पवार म्हणाले, हवामानाच्या बाबतीतले अंदाज माध्यमांनी दाखवले होते. मात्र हातातोंडाशी आलेले घास, कापूस, द्राक्ष यांचे नुकसान झाले. पिकविमा उतरवणे हा एकमेव उपाय आहे. काल मी अनेकठिकाणी पाहिले तर कांद्याच्या बाबतीत मदत मिळालेली नाही, प्रचंड नुकसान झालेले आहे. अजून 2 दिवस धाकधूक कायम आहे. वाईट वाटते. पाहवत नाही. हातातोंडाशी आलेला घास गेला. आता पिक काढायचे आणि बाजारात नेऊन विकायचे पैसे घेऊन जे काही कर्ज असेल ते फेडायचे. मात्र त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.