जळगाव : “गुलाबराव गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली”, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना जोरदार प्रत्यूत्तर दिले.जळगावात जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. बंडखोरीनंतर शिंदे गटातील नेत्यांवर गद्दार असा आरोप होतो. या आरोपांवर गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीयवाद करत असाल तर होय, मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली अशी कबुलीच गुलाबराव पाटील यांनी दिली.
जळगावातील बिलखेडा गावात विविध विकासकामे आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी पाटील यांनी विरोधकांच्या गद्दारीच्या आरोपावर थेट प्रतिहल्ला चढविला. विरोधाला विरोध करायचा पण मतदार संघात काही काम करायचं नाही. ”बिलखेडेत साधी एक मुतारी हे लोक बांधू शकले नाहीत आणि भाषणं ठोकतात”, असा जोरदार हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला.आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो. हो तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असलयाचेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही दोन दिवसांपूर्वी टीका केली होती.” पिक्चर लागून सात महिने झाल्यानंतर त्याला महत्त्व नसतं. गद्दार गद्दार हे ऐकून लोकही आता बोअर झाले आहेत”, असे गुलाबराव पाटील म्हणाले होते.
“तुम्हाला काय मिळालंय, नाही मिळालंय, लोकांनी काय गद्दारी केली हे आता सगळं संपलय. त्यांनी आता नवीन उभारीने पक्ष बांधला पाहिजे आणि आम्हाला चितपट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी निवडणुकीला आणि निवडून यायला महत्त्व आहे. तुम्ही तुमचे लोक निवडून आणा, आम्ही निवडून येण्याचा प्रयत्न करू” असंही गुलाबराव पाटील म्हणाले होते.