नवी दिल्ली ः २६/११ चा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जकीउर रहमान लखवीला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. दहशहवाद्यांना मदत करणे आणि त्यांना पैसा पुरविणे, या आरोपाकाली त्याला अटक करण्यात आली आहे. हाफीज सईदसोबत जकीउर रहमान लखवीने २६/११ चा दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता.
यापूर्वी २००८ सालीच युएनएससीच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी म्हणून जकीउर लखवीला घोषीत केलेले होते. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात हे स्पष्ट झाले होते की, जकीउर लखवीने हाफीज सईदबरोबर मिळून हल्ल्या करण्याची योजना आखली होती.
मुंबईच्या २६/११ हल्ल्यामध्ये संपूर्ण शहर दहशतीखाली होते. लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत अंदाधूंद गोळीबार केला होता. त्यामध्ये सुमारे १६६ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते.