सांगोला : बेकायदेशीररित्या वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू झोळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल हजरत पठाण, पोलीस काॅन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे हे कटफळ दूरक्षेत्र हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी रविवारी रात्री पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, एक टिपर वाळू भरून जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
त्याआधारे लोटेवाडी येथील पाण्याच्या टाकीसमोर पोलिसांनी ओव्हरटेक करून चालकाला हाताचा इशारा करून टिपर बाजूला घेण्यास सांगितले. यावेळी त्याने टिपर बाजूला घेऊन थांबवत त्याच्यासह इतर दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी टिपरच्या हौद्याची तपासणी केली असता तीन ब्रास वाळू असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी वाळूसह (एमएच ०४ /डीके २७६६) टिपर जप्त करून पोलीस ठाण्यास जमा केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण बापू वाघमोडे यांनी अज्ञात चालक मालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.