बॅंकेतील 3 कोटीच्या सोन्याची चोरी : मुख्य सूत्रधारासह तिघांना साताऱ्यातून अटक

0
सातारा : केरळ राज्यातील एका बँकेचे 3 कोटी रुपये किमतीचे साडेसात किलो सोने चोरल्याच्या गुन्ह्यात शुक्रवारी रात्री केरळ आणि सातारच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाई दरम्यान चौघांना शहरातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याची एक महागडी चारचाकी देखील जप्त केली आहे. तर नाशिकमधील जोशी या मुख्य सूत्रधारासह कोरेगाव व साताऱ्यातील तिघांना केरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हाॅटेलमधून ताब्यात घेतलेल्या संशयितांना केरळ येथे नेण्यात आले आहे. केरळ पोलिसांत एका बँकेचे तीन कोटी रुपये किमतीचे सोने चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास केरळ पोलिस करत होते. तांत्रिक तपासात नाशिक येथील निक जोशी या युवकाचा या गुन्ह्यात समावेश असून तोच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. त्यानुसार केरळ पोलिसांनी नाशिकवर लक्ष केंद्रीत केले, मात्र संशयित जोशी हा वारंवार जागा बदलत होता.
गेले काही दिवस नाशिकचा जोशी सातारा परिसरात आल्याची माहिती केरळ पोलिसांना मिळाली होती. यानुसार केरळ पोलिसांचे एक पथक शुक्रवारी सकाळी सातारा येथे दाखल झाले. त्यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन गुन्ह्याची माहिती तसेच संशयित जोशी सातारा परिसरात असल्याचे सांगितले. यानुसार बन्सल एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ यांना केरळ पोलिसांना मदत करण्याचा सूचना केल्या.
त्यानुसार पोलिस हवालदार मुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, मंगेश महाडिक यांच्यासह इतर पोलिस केरळ पोलिसांच्या मदतीला गेले. संशयितांचा शोध घेताना नाशिक येथील संशयित जोशी हा साताऱ्यात महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील एका हॉटेलमध्ये दोन साथीदारांसह तसेच कोरेगाव तालुक्यातील एका मित्रासमवेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत नाशिक येथील मुख्य संशयित जोशी व त्याच्या सातारा व कोरेगाव येथील तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर सातारा येथे प्राथमिक चौकशी करुन त्या चौघांना केरळ पोलिसांनी केरळ येथे नेले. मात्र ताब्यात घेतलेल्या नाशिक येथील जोशी गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असला तरी सातारा जिल्ह्यातील युवकांचा त्यात सहभाग आहे का? हे तपासानंतर समोर येणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.