रायगडमध्ये आढळली आणखी एक संशयीत बोट

0
रायगड : उरणच्या करंजाजवळील समुद्रात पुन्हा एकदा संशयास्पद बोट आढळली आहे. ही बोट मासेमारीची असून ती विनानंबरची असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. काल रात्री ही बोट आढळल्याचे सांगितले जात आहे. रात्रीच्या वेळी खाडी परिसरात अधिकारी गस्त घालत असताना त्यांना ही बोट आढळून आली. या बोटीला नंबरप्लेट नसल्याने अधिकाऱ्यांचा संशय बळावला. त्यांनी या बोटीचा पाठलाग केला. त्यांनी रेवस आणि करंजादरम्यान या बोटीचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी ही बोट ताब्यात घेऊन उरणच्या बंदरात आणली. याप्रकरणी आता पोलिस तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, डिझेल चोरीसाठी ही बोट वापरत असल्याचा संशय आहे. तथापि, घातपातासाठी या बोटीचा वापर झाला का, याबाबतही तपास सुरू आहे.
महिनाभरापूर्वी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी 2 संशयास्पद बोटी आढळल्या होत्या. यानंतर जिल्ह्यात लगेच हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. एका बोटीत एके-47 रायफल्स व स्फोटके सापडले होती. या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीबाबत विधिमंडळाच्या सभागृहात माहिती दिली होती.
फडणवीस म्हणाले होते की, रायगडमधील श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर किनाऱ्यावर एक 16 मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. बोटीमध्ये 3 ए.के. रायफल्स आणि दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येताच तत्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला.
Leave A Reply

Your email address will not be published.