मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील हिरे व्यापारी नीरव मोदी याला लवकरच भारतात आणले जाणार आहे. ब्रिटनच्या न्यायालयाने त्याला भारताच्या ताब्यात देण्यास मंजुरी दिली आहे.
लंडनमधील न्यायालयात याप्रकरणी ऑनलाइन सुनावणी झाली. न्यायाधीश सॅम्युअल गुजी यांनी नीरव मोदीविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे मान्य केले. गेली दोन वर्षे ही सुनावणी सुरू होती. नीरव मोदीविरुद्ध भारतातही खटला सुरू आहे. त्याला भारताच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला न्याय मिळणार नाही असे मानता येणार नाही असे न्यायाधीशांनी सांगितले. नीरव मोदीने आपली मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा न्यायालयात केला, परंतु न्यायाधीशांनी तो फेटाळून लावला.
मुंबईतील आर्थर रोड तुरुंग हे लंडनमधील तुरुंगांपेक्षाही चांगले असून तेथील बॅरेक नंबर 12 मध्ये नीरव मोदीसाठी पुरेशा सुविधा आहेत असेही न्यायाधीशांनी सांगितले. कोरोना आणि हिंदुस्थानातील तुरुंगांमधील खराब व्यवस्थेमुळे मोदीवर मानसिक परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद मोदीच्या वकिलांनी केला. तोसुद्धा न्यायाधीशांनी फेटाळून लावला.