पुणे : लष्कराच्या रिलेशन आर्मी भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचा पेपर परिक्षेच्या एक दिवस आधी मिळण्यासाठी ॲकॅडमी चालक आरोपींनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पाच लाख रुपये घेतल्याचे तपासातून पुढे आले आहे. या गुन्ह्यात अटक चार आरोपींच्या राज्यात विविध ठिकाणी ॲकॅडमी आहेत.
या गुन्ह्यात वसंत विजय किलारी (वय ४५, रा. दिल्ली. मुळ रा. आंध्रप्रदेश), थिरू मुरुगन थंगवेलू (वय ४७, रा. वेलिंग्टन, तमिळनाडू) आणि भारत लक्ष्मण अडकमोळ (वय ३७, रा. नगरदेवळा, जळगाव) यांच्या कोठडीत पाच एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर महेंद्र चंद्रभान सोनावणे (वय ३७, रा. अहमदनगर), अलीअख्तर अब्दुलअली खान (वय ४७), आजाद लालामहमद खान (वय ३७, दोघेही रा.उत्तरप्रदेश) आणि किशोर महादेव गिरी (वय ४०, रा. बारामती) यांना देखील या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. या चारही आरोपींच्या पुणे, बारामती, फलटण, वडूज, इस्लामपूर, भुर्इंज, पुसेगाव, रहमतपुर, कराड, सोलापूर, हातकलणंगणे, कोल्हापूर, सांगली, बेळगाव या ठिकाणी ॲकॅडमी आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांकडून देशभक्ती व देशसेवा करण्याची इच्छेचा गैरफायदा घेऊन त्यांना परिक्षेच्या एक दिवस आधी पेपर दिले. त्याबदल्यात विद्यार्थ्यांकडून पाच लाख रुपये घेतले, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी गणेश संपत साळुंखे (वय २१, रा. तासगाव) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किलारी, थंगवेलू आणि अडकमोळ यांनी त्यांच्याकडून पेपर देण्यासाठी एक लाख रुपये घेतले. किलारी आणि थंगवेलू हे मेजर दर्जाचे अधिकारी आहेत. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी केली.
यापूर्वी झालेल्या परिक्षांचाही होणार तपास :
सैन्य दलात होणा-या भरतीची मोठी साखळी आहे. या गुन्ह्यात अटक आरोपींनी यापूर्वी झालेल्या रिलेशन आर्मी भरतीसाठीच्या लेखी परिक्षांची प्रश्नपत्रिका परिक्षेच्या आधीची मिळविल्याची शक्यता आहे. याबाबत अधिक तपास करणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींकडे मिळू शकते, असा युक्तिवाद ॲड. सप्रे यांनी केला.