शिर्डी : शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात भाविकांची प्रतिक्रिया घेतली आणि गर्दी जमा केली म्हणून एका वृत्त वाहिनीच्या रिपोर्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला
असल्याची माहिती समोर येत आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल करण्यात आला. 16 नोव्हेंबर 2020 रोजी मंदिरे खुली करण्यात आली. त्यावेळी करण्यात आलेल्या वृत्तांकनाबाबत आता शिर्डी संस्थानकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तब्बल अडीच महिन्यानंतर हा गुन्हा दाखल केला गेला. हा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी राजेंद्र ठाकरे यांनी फिर्याद दिली आणि भादंवी कलम 353, 188, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, एकीकडे गावकरी आणि शिर्डी संस्थान हा संघर्ष सुरू असतानाच संस्थानकडून माध्यम प्रतिनिधीविरोधात फिर्याद देण्यात आल्याने हे कृत्य सूड बुद्धीने केलं गेल्याची चर्चा होत आहे.