नाशिक : राज्यातील काही भागांना सोमवारी पहाटे अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात वादळी वारे व गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. आधीच कापूस, कांदे व फळपिकांना योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर एेन होळीच्या सणात नवे विघ्न ओढवले.
नाशिक जिल्ह्यात २६८५.३५ हेक्टरवरील द्राक्ष, कांदा, गहू आणि डाळिंबासह भाजीपाला पिके अक्षरश: उद्ध्वस्त झाली. निफाड, सिन्नर, बागलाण, येवला, दिंडोरी, नाशिक तालुक्यात जास्त नुकसान झाले. धुळ्याच्या साक्री तालुक्यात खोरी टिटाने परिसरातही तासभर गारपीट झाली. त्यामुळे रस्त्यावर गारांचा खच पडला. नंदुरबार जिल्ह्यातील मोग्रणी गावालाही गारपिटीचा तडाखा बसला. या दोन्ही जिल्ह्यांतील गहू, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विदर्भ-मराठवाड्यात तुरळक पावसाने हजेरी लावली. बुलडाणा जिल्ह्यातील साखळी गावात वीज कोसळून १६ मेंढ्या दगावल्या. मुंबई, ठाण्यात दुपारी, तर छत्रपती संभाजीनगरात रात्री मुसळधार पाऊस बरसला.
पश्चिमी चक्रवातामुळे अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राजस्थानमधून विरुद्ध दिशेने वाहणारा चक्रीय वारा तसेच मध्य छत्तीसगड ते दक्षिण कोकणपर्यंत हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अवकाळी पाऊस होत आहे. ७ ते ९ मार्चपर्यंत मुंबई, कोकण वगळता मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
रब्बी पिकांची कापणी लवकर पूर्ण करा. कांदा, पत्ताकोबी, फुलकोबीवरील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरिफाॅस २ मिली प्रतिलिटर पाण्यातून फवारावे. वेलवर्गीय भाजीपाल्याला आधार देण्यासाठी मंडप तसेच इतर पिकांसाठी ताटी पद्धतीचा वापर करण्याचा सल्ला इगतपुरी येथील भात संशोधन केंद्राचे प्रमुख अन्वेषक एच. एम. पाटील यांनी दिला.