विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन
रविवारी वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे महामेळावा
पिंपरी : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत उत्सवी वर्षानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जिल्हा न्यायालय पुणे यांच्या समन्वयाने मावळ तालुक्यामध्ये महामेळावा होणार आहे. रविवारी (दि. 31) सकाळी साडेआठ वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे हा महामेळावा होणार आहे.
यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, जिल्हास्तरीय सर्व अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी , जिल्हा कोर्ट पुणे मधील न्यायमूर्ती, जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित असणार आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ तात्काळ देण्यात येणार आहे.
महामेळाव्यात विविध प्रकारचे दाखले वाटप, पुरवठा विभागातील रेशन कार्ड, मतदार नोंदणी, आधार नोंदणी, कोविड 19 लसीकरण, नेत्र तपासणी, रक्तदाब मधुमेह तपासणी, विविध शासकीय योजनांची माहिती, माती परीक्षण, कृषी विभागाकडील विविध योजनांची माहिती देणे तसेच लाभ देणे इत्यादी कामे केली जाणार आहेत.
मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून जास्तीत जास्त नागरिकांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.