लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू चंद्रशेखर पाटील यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी रविवारी सकाळी 9 च्या सुमारास लातूर येथील शिवराज पाटलांच्या देवघर या निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे लातूरमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
चंद्रशेखर पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरात आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. 81 वर्षीय चंद्रशेखर पाटील शेती करत होते. त्यांच्याकडे बंदुकीचा परवानाही होता. त्यांच्या पश्चात 2 मुले, विवाहित मुलगी, नातंवडे असा मोठा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले वकील आहेत. त्यांचे कौटुंबिक वातावरण व सार्वजनिक जीवनही चांगले होते. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्याचे वकील पुत्र लिंगराज पाटील तातडीने घटनास्थळी पोहोचले. चंद्रशेखर पाटील वृद्धापकाळाशी संबंधित आजार व मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे.
चंद्रशेखर उर्फ हणमंत पाटील यांनी रविवारी सकाळी 9 च्या सुमारास आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या काही क्षणांतच ही बातमी वाऱ्यासारखी लातुरात पसरली. या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
चंद्रशेखर पाटील यांचे लातूरमध्ये शिवराज पाटील यांच्या घराजवळच घर आहे. ते दररोज सकाळच्या वेळी वृत्तपत्र वाचन व चहासाठी चाकूरकरांच्या देवघर या निवासस्थानी येत असत. रविवारी सकाळीही ते नेहमीप्रमाणेच तिथे आले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकूण घरातील सदस्य धावत बाहेर आले. तिथे त्यांना चंद्रशेखर पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.
चंद्रशेखर चाकूरकर यांनी फार पूर्वीच आत्महत्या करण्याचा निश्चय केल्याचेही स्पष्ट झाले आहे. ते रविवारी सकाळी घराबाहेर पडले, तेव्हा त्यांनी स्वतःच्या मोबाईलमधील काही ओळखीच्या लोकांना गुड बाय असा टेक्स्ट मेसेज केला होता. त्यानंतर काही वेळाने त्यांनी व्हॉट्सएपवरही त्याचे स्टेटस ठेवले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली.