कोल्हापुरात तणाव; घरे, दुकानावर दगडफेक, मोठा पोलीस बंदोबस्त

0

कोल्हापूर : काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्याने कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, आक्षेपार्ह स्टेट्सविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज आंदोलन पुकारले. सकाळी 11 वाजेपासून शिवाजी चौक परिसरात हिंदूत्ववादी संघटनांनी एकत्र परिसर दणाणून सोडला. त्यानंतर शिवाजी चौक येथील गंजी गल्ली परिसरात काही आंदोलकांनी घरे, दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. जमाव आक्रमक झाल्याने त्याला पांगवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. सध्या कोल्हापूर शहरात एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत स्वतः रस्त्यावर उतरून जमावास आवरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोल्हापूर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

तसेच, आज (बुधवार) हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज कोल्हापूर कडकडीत बंद आहे. हा बंद मागे घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने हिंदुत्ववादी संघटनांना केले आहे. परंतु हिंदुत्ववादी संघटना बंदवर ठाम आहेत. आज सकाळपासून शहरातील व्हिनस कॉर्नर परिसरासह अन्य ठिकाणी शुकशुकाट आहे. बस, रिक्षा सुरु आहेत.

जिल्हाबंदीचा आदेश लागू करताना प्रशासनाने म्हटले आहे की, लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे हद्दीतील काही तरुणांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे काही आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडण्याचे नाकारता येत नसल्याने बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

हिंदूत्ववादी संघटनांनी केलेल्या आवाहनानंतर कोल्हापूर शहर कडकडीत बंद आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणांना अटक करण्याची मागणी करत हिंदुत्ववादी संघटना शिवाजी चौक परिसरात जमले आहेत. शहरात सर्वत्र प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व भागातील दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या, रिक्षा, बस, वाहतूक बंद आहे. कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमुळे शिवाजी चौक महापालिका परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.