मुंबई : बाबरी आम्ही पाडली, असे छातीठोकपणे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या दाव्यावर त्यांच्या पश्चात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य त्यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भाजपविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आक्रमक झालेत. खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे, तर आज दुपारी उद्धव ठाकरे याप्रकरणी पत्रकार परिषद घेणार आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, 6 डिसेंबर 1992 रोजी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने बाबरी मशीद पाडली. बाबरी मशिदीचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला नाही. ती कारसेवकांनी पाडली. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतो म्हणाले. म्हणजे काय? त्यांनी चार सरदार तरी पाठवले का, असा सवालही त्यांनी या मुलाखतीत केला.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने मला तिथे ठेवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आमच्या पाठिशी होती. मात्र, ते यात उघडपणे सहभागी नव्हते. त्यांनी समविचारी संघटनांना हे काम वाटून दिले होते. संजय संजय राऊत बाबरी मशीद पाडल्याबद्दल बोलतात. मात्र, ते त्यावेळी अयोध्येत तर होते का?, असा सवालही त्यांनी केला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेतही पाटील यांनी बाबरी पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नसल्याचा दावा केला.
चंद्रकांत पाटलांनी केलेला दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का ?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. एकनाथ शिंदेंना हा दावा मान्य नसेल तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, मिंधे गटात कोणी खऱ्या आईचे दूध प्यायलेला आहे का जो शिवसेना प्रमुखांच्या अपमानाविरोधात मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे आव्हानही संजय राऊतांनी दिले आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुंत्वाच्या विचाराचे आम्हीच पाईक आहोत असे बोलणारे सरकार जमा 40 मिंधे आता काय करणार? काल याच बाळासाहेब विरोधकांच्या चड्डीची नाडी पकडून ते अयोध्येत जाऊन आले. आता साहेबांच्या अपमानाविरोधात कोण दांडका उचलणार?, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.