नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) एका अहवालामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. भारतासह जगभरातील लोक चुकीच्या जीवनशैलीमुळे संकटात सापडले आहेत.
जगभरात हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. भारतात 66% लोक जीवनशैलीच्या आजारांमुळे मरत आहेत. चुकीची जीवनशैली जगातील तीन चतुर्थांश मृत्यूचे कारण आहेत. दर 2 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे.एकंदरीत आळशीपणा महागात पडत असल्याचं दिसत आहे. WHO च्या मते, आठवड्यातून 150 मिनिटे साधा व्यायाम किंवा आठवड्यातून 75 मिनिटे जोमाने व्यायाम करत नाहीत, अशा लोकांना आळशी मानले जाते.
1 कोटी 70 लाख मृत्यूंपैकी 86% लोक मध्यम उत्पन्न देशांतील आहेत, जे या आजारांना बळी पडत आहेत. या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. 2011 ते 2030 या 20 वर्षांत हृदयविकार , श्वसनाचे आजार, कर्करोग आणि मधुमेहामुळे जगाला 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. डब्ल्यूएचओच्या मते, जर गरीब देशांनी या आजारांना रोखण्यासाठी दरवर्षी 1 हजार 800 कोटी खर्च केले तर मृत्यू कमी होतील आणि अनेक कोटींचे आर्थिक नुकसानही वाचेल. भारतातील 31% लोकांना उच्च रक्तदाब आहे. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, अर्ध्या लोकांना हे माहित नाही की त्यांना उच्च रक्तदाब आहे.
भारतातील एकूण मृत्यूंपैकी 66% मृत्यू हे खराब जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांमुळे होतात. भारतात दरवर्षी 60 लाख 46 हजार 960 लोकांचा मृत्यू होत आहे. जीव गमावलेल्या लोकांपैकी 54% लोक 70 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. भारतात दरवर्षी 28% लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू होत आहे. 12% लोक श्वसनाच्या आजाराने, 10% कर्करोगाने, 4% लोक मधुमेह आणि उर्वरित 12% लोक चुकीच्या जीवनशैलीमुळे मरतात.