मुंबई: ‘पुद्दुचेरी झालं, आता महाराष्ट्र’ असं स्वप्न आता काही जणांना पडत असेल तर त्यांनी स्वप्नातच राहावं, असा टोला शिवसेनेनं सामनामधून लगावला आहे. महाराष्ट्राचं मन खंबीर आहे, इरादे पक्के आहेत. मध्य प्रदेश, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत, अशा स्पष्ट शब्दांत शिवसेनेनं भाजपला इशारा दिला आहे.
काँग्रेसच्या नाराज आमदारांनी राजीनामे दिल्यानं पुद्दुचेरीतलं नारायणसामी यांचं सरकार कोसळलं. यावरून शिवसेनेनं भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री नारायणसामी यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पाच आमदारांनी बेडुकउड्या मारल्याने सामी यांचे सरकार अल्पमतात आले. पाच आमदारांनी साडेचार वर्षांपर्यंत काँग्रेसच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यात अण्णा द्रमुकचे आमदारही होते, पण आता हे सर्व आमदार कमळफुलाचे भुंगे बनले आहेत. विधानसभा चारेक महिन्यांत लागतील. तोपर्यंत भाजप किंवा केंद्र सरकारला थांबता आले असते, पण येथेही सरकार पाडून दाखवले असा टेंभा मिरवायला भाजप मोकळा झाला,’ अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपचा समाचार घेतला आहे.
पुद्दुचेरीतले सरकार पाडून दाखवले, आता मार्च-एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ला सुरुवात करू, असे काही भाजप पुढाऱ्यांनी जाहीर केले. मध्य प्रदेशातील सरकार पाडले तेव्हाही ”पुढचा घाव महाराष्ट्रावर” असे जाहीरच केले होते. त्यानंतर ”बिहारचे निकाल एकदाचे लागू द्या, मग पहा महाराष्ट्रात कसे परिवर्तन घडवून दाखवतो” वगैरे बतावण्या करून झाल्या. आता बात पुद्दुचेरीची सुरू आहे, पण जशी ‘दिल्ली बहुत दूर है’ त्याप्रमाणे ‘महाराष्ट्र तो बहुतही दूर है!’ असे चित्र आहे. पुन्हा मध्य प्रदेश, पुद्दुचेरीत काँग्रेस होती. महाराष्ट्रात शिवसेना आहे. त्यामुळे कोणी नसती उठाठेव करण्याच्या भानगडीत पडू नये.