हैदराबादच्या तरुणीची लंडन मध्ये हत्या

0

नवी दिल्ली : उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या हैदराबादमधील एका 27 वर्षीय युवतीची एका ब्राझीलच्या तरुणाने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोंथम तेजस्विनी असे मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, मुळची हैदराबादची असलेली कोंथम तेजस्विनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी मार्च महिन्यात लंडनमध्ये गेली होती. तिथे वेंबलीमधील नील्ड क्रेसेंट या भागात ती शेअरिंग फ्लॅटमध्ये राहत होती. काही दिवसांपूर्वी या फ्लॅटमध्ये एक ब्राझीलचा तरुणही राहण्यासाठी आला. मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास या तरुणाने तेजस्विनीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक 28 वर्षीय तरुणी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळावरून 24 वर्षीय तरुण आणि 23 वर्षीय तरुणीला हत्येच्या संशयातून अटक करण्यात आली. त्यानंतर आणखी एका 23 वर्षीय संशयितालाही नंतर अटक करण्यात आली. या आधी महानगर पोलिसांनी केव्हिन अँटोनियो लॉरेन्सो डे मोरैस याचा फोटो जारी करत त्याला पकडण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. त्याला हत्येच्या संशयात अटक करण्यात आली असून तो उत्तर लंडनमधील पोलिस कोठडीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा एक वेगवान तपास असून त्याला पकडण्यासाठी नागरिकांच्या मदतीबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो असे मुख्य तपास अधिकारी लिंडा ब्रेडली म्हणाल्या. या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे त्या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.