‘मी भाजपचा खासदार, म्हणून ED इकडं येणार नाही’

0

सांगली : भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून वारंवार केला जात आहे. तर भाजपकडून आरोपांचे खंडन केले जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी भाजप नेते हर्षवर्धन पाटील  यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता भाजप खासदार संजय पाटील यांचाही असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ईडीसंदर्भात विधान करताना खासदार संजय पाटील यांनी आपण भाजपचे खासदार असल्याचे म्हटले आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगावमधील एका मॉलच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना खासदार संजय पाटील यांनी ईडीसंदर्भात भाष्य केले आहे. आपल्या भाषणात गमतीशीरपणे ते सांगत असताना, त्यांनी भाजप नते हर्षवर्धन पाटील यांचा उल्लेख केला. वैभवदादा मी भाजपचा खासदार आहे, त्यामुळे ईडी काय एवढ्यात इकडं येणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे. पाटील यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाटील पुढे म्हणाले, आम्ही गाडी वापरताना बँकेचं कर्ज काढून 40 लाखाची गाडी घेणार, पण लोकांपुढे ते जास्त दिसतं. ईडीनं आमची कर्ज बघितली तर, ते म्हणतील ही माणसं आहेत की काय, एवढी आमची कर्ज आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी गंमती गंमतीत म्हटलं होतं की, भाजपमध्ये आल्यापासून झोप चांगली लागतेय, अशी आठवण खासदार पाटील यांनी करुन दिली.
त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आता पुन्हा एकदा भाजप आणि ईडीची चर्चा रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.