कबड्डीपटू खेळाडूची हत्या;12 तासात मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

0

पुणे : बिबवेवाडीत  एकतर्फी प्रेमातून १४ वर्षाच्या क्षितिजा अनंत व्यवहारे हिच्या मानेवर वार करुन हत्या करणार्‍या ऋषिकेश ऊर्फ शुभम बाजीराव भागवत (२१, रा. सुखसागर नगर) याच्यासह तिघांना पुणे पोलिसांनी रात्रीत अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीचा खून करुन पळून गेलेल्या चार संशयित आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले. शुभम भागवत हा क्षितिजा व्यवहारे हिचा नातेवाईक आहे. तो सुखसागरनगरला मावशीकडे राहून मिळेल ती कामे करत होता. तो क्षितिजा हिला गेल्या दीड वर्षांपासून त्रास देत होता. ही गोष्ट क्षितिजाच्या पालकांना समजल्यावर त्यांनी शुभम याला समज दिली होती. त्यानंतर तो चिंचवडला रहायला गेला होता.

 

त्यानंतर काल सायंकाळी तो दोन मित्रांना घेऊन यश लॉन्स येथील मैदानावर आला. त्याने क्षितिजाला बाजूला बोलाविले. तिने तू येथे काल आलास असे विचारल्यावर त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्याच्या साथीदाराने तिच्या पायावर वार केला. शुभम याने तिच्या गळ्यावर कोयत्याने वार केला. तिच्या मैत्रिणी धावत तेथे आल्यावर त्यांनी खेळण्यातील पिस्तुलाने त्यांना धाक दाखवत हत्यारे तेथेच टाकून ते पळून गेले होते.

या प्रकारानंतर तिघेही जवळच्या झुडपात रात्रभर लपून बसले होते. बिबवेवाडी पोलिसांनी त्यांना पहाटे या झाडाझुडपातून शोधून शुभमसह तिघांना पकडले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे आज सकाळी घटनास्थळी भेट देणार असून त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याला भेट देणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.