उरुळी कांचन येथे गोळीबारात दोघांचा मृत्यू

0

उरुळी कांचन :  उरुळी कांचन येथील हॉटेल सोनईसमोर दौंड तालुक्यातील राहू येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप यांच्यावर चार ते पाच जणांनी शुक्रवारी (ता. २२ ऑक्टोबर) दुपारी अडीचच्या सुमारास गोळीबार केला. यात संतोष जगताप यांचा मृत्यू झाला, तर संतोष जगताप यांनी जखमी अवस्थेत प्रत्युत्तरात दाखल केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर ठार झाल्याचे पुढे आले आहे. इतर तीन ते चार जण पळून गेले आहेत, तसेच संतोष जगताप यांचा अंगरक्षक जखमी झाला असून त्याच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनईसमोर संतोष जगताप हे दुपारी अडीचच्या सुमारास चर्चा करीत होते. त्यावेळी आलेल्या चार ते पाच जणांनी जगताप व त्यांच्या अंगरक्षकावर घातक हत्याराने हल्ला चढविला, तसेच त्यांच्या दिशेने गोळीबारही केला. यात संतोष जगताप व त्यांचा अंगरक्षक गंभीर जखमी झाले. त्याही अवस्थेत संतोष जगताप यांनी हल्लेखोरांना प्रत्युत्तर देत गोळीबार केला, त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला आहे, तर उर्वरित पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

जखमी संतोष जगताप यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, गोळीबाराचे कारण अद्याप समोर आले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.