एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं, राज्यपालाचे घटनाबाह्य काम

0

मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतली. भाजपने शिंदे गटाच्या 50 आमदारांना पाठिंबा देऊन राज्यामध्ये बंडखोरांचे सरकार स्थापन केले. काल झालेल्या शपथविधी समारंभात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र आता शिंदे सरकारसमोर नवा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निलंबनाची कारवाई असताना एकनाथ शिंदे यांचा शपथविधी कसा झाला? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारला आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार अरविंद सावंत म्हणाले की, मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यावं हीच मागणी उद्धव ठाकरे करत होते. मात्र भाजपने अडीच वर्षापूर्वी ते केले नाही. परंतु आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं. राज्यपाल घटनाबाह्य वागतात. शपथविधीला सर्वात मोठ्या पक्षाला बोलवलं जातं. मग एकनाथ शिंदे यांना काय म्हणून बोलावलं. निलंबनाची नोटीस असताना शपथविधी कसा झाला? अपात्रतेची कारवाई होण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका आहे. 11 जुलैला सुनावणी होणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्याचसोबत मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यानंतर दिल्लीवरुन फोन आल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षाच्या आदेशाचा मान देवेंद्र फडणवीस यांनी राखला पण हीच पक्षशिस्त एकनाथ शिंदे यांच्यात कुठे आहे? असं सांगत अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.