महाराष्ट्राचे सत्ताकारण; आज फैसला : 16 आमदार पात्र की अपात्र?

0

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आज घोषित करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेलेले एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे 16 आमदार अपात्र ठरणार की नाही? याबाबत आज फैसला जाहिर होणार आहे. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष आजच्या या निकालाकडे लागले आहे.

16 आमदार अपात्र ठरणार की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ निर्णय देईल. कोर्टाच्या निकालावरच शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्यही अवलंबून आहे. सत्ता संघर्षावर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांचे घटनापीठ निर्णय देणार आहेत.

सरन्यायाधीश चंद्रचूड हे एकटेच निकालाचे वाचन करणार आहेत. त्यामुळे पाचही न्यायमूर्तींचा सर्वसहमतीने निर्णय असण्याचे संकेत आहेत. निकालात मतभिन्नता असेल तर दोन न्यायमूर्ती वेगवेगळे निकाल वाचन करण्याची प्रथा आहे. 16 आमदारांनी व्हीपचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्यास कोर्ट अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवू शकते अन‌् सिद्ध न झाल्यास क्लीन चिट देऊ शकते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यानंतर 21 जून 2022 रोजी आपल्या समर्थक आमदारांसह सुरत आणि तिथून गुवाहटीला दाखल झाले. तेव्हा शिवसेनेने एकनाथ शिंदेंना कारवाईचा इशारा दिला. अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली. तसेच सुनील प्रभू यांची प्रतोदपदी नियुक्ती केली. याला उत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांनी प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली.

महाराष्ट्राकडे निघण्यापूर्वी एक दिवस अगोदर म्हणजेच 28 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांनी मिळून गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितरित्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.