भाजप सोबत अनेक मिटींगा, ऐनवेळी शिवसेनेसोबत जाण्यास सांगितले

अजित पवार यांचे अनेक गौप्य स्फोट

0

मुंबई : महाराष्ट्रात शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नुकतेच उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांनी आज आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. शरद पवार गटाची दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी एक वाजता, तर अजित पवार गटाची वांद्रे उपनगरातील भुजबळ नॉलेज सिटी येथे एमईटी कॉलेच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे.

एकूण 53 आमदारांपैकी ज्या गटात सर्वाधिक आमदार असतील, तोच गट आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा घटनात्मक अधिकार सांगू शकेल. आज बैठकांमधून कोणत्या गटाकडे किती आमदार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार विरुद्ध शरद पवार या लढाईसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांना प्रतिज्ञापत्र आणण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी व्हीपही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार गटाला 42 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले आहे.

शरद पवार बैठकीसाठी वायबी सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. ढोल-ताशे वाजवून कार्यकर्त्यांनी जल्लोषात शरद पवारांचे स्वागत केले.

वांद्रे येथील एमईटी कॉलेच्या मैदानावर अजित पवार गटाची बैठक सुरू आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, ही वेळ आपल्यावर का आली? शरद पवारांच्या छत्रछायेखाली, मार्गदर्शनाखालीच मी तयार झालो आहे. शरद पवार आपले श्रद्धास्थान आहे, याबाबतही ही तीळमात्र शंका घेण्याचे कारण नाही. 1978ला शरद पवारांनी वसंतदादांविरोधात बंड करून पुलोदचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून शरद पवारांना महाराष्ट्राने साथ दिली.

अजित पवार म्हणाले, आपल्या देशाला कुणी ना कुणी करिष्मा असणारा नेता लागतो. इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण या सर्वांना देशाने साथ दिली. त्यानंतर अनेक स्थित्यंतरे झाली. आम्ही तरुण होतो तेव्हा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी काही तरी करुन दाखवण्याची आमची महत्त्वकांक्षा होती. 1999 मध्ये राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आले तेव्हा माझ्याकडे फक्त 7 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली. तरीही मी काही तक्रार केली नाही. नंतर 2004ला राष्ट्रवादीचे 71 आमदार आले. काँग्रेसचे 69 आमदार आले. तेव्हा सोनिया गांधींनी विलासराव देशमुखांना सांगितले होते की, राष्ट्रवादीच्या जागा अधिक असल्याने मुख्यमंत्री त्यांचा होईल. मात्र, 4 मंत्री अधिक घेऊन आलेली संधी राष्ट्रवादीने घालवली. ती संधी मिळवली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसला असता. त्यानंतर 2022 मध्ये आलेली मुख्यमंत्रीपदाची संधीही राष्ट्रवादीने घालवली

अजित पवार म्हणाले, मी कधीही आमदारांसोबत भेदभाव केला नाही. कामाच्या बाबतीत मी कधीही पक्षपात केला नाही. विकास हेच आमचे ध्येय आहे. आम्ही काल घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही अनेक चांगले निर्णय घेतले. सत्तेत जाऊन लोकांचे प्रश्न सोडवता येत असेल तर तसे का करायचे का नाही.

अजित पवार म्हणाले, 2014ला भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. तेव्हा राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. नेत्यांचा निर्णय म्हणून आम्ही गप्प बसलो. आम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियमवर जायला सांगितले. आम्ही गेलो. मात्र, आमच्या नेत्यांना तेव्हा भाजपबरोबर जायचेच नव्हते तर आम्हाला शपथविधीसाठी का पाठवले? त्यानंतर 2017ला पुन्हा वर्षा बंगल्यावर बैठक झाली. आमच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार नेते होते. कुठली खाते, पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे, याची चर्चा केली. मी हे खोटे सांगत नाही. मी कधीही खोटे बोलत नाही. खोटे बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही. त्यानंतर आम्हाला दिल्लीला बोलावले. दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप असे सरकार राहिल. आमच्या नेत्यांना हे पटले नाह. शिवसेनेवर तेव्हा आमच्या नेत्यांनी जातीयवादाचा आरोप केला.

अजित पवार म्हणाले, 2019मध्ये निकालानंतर मोठ्या उद्योगपतींच्या घरी आपले वरिष्ठ व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यात फडणवीस व मी हजर होतो. आम्हाला सांगितले याबाबत कुठेही बोलायचे नाही. त्यामुळे मी बोललो नाही. त्यानंतरचा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे. हे सर्व चालू असताना अचानक शिवसेनेसोबत जाण्याचे ठरले. 2017ला शिवसेनेला जातीयवादी म्हणून आमचे नेते आरोप करत होते. मात्र, अचानक असा काय चमत्कार झाला की, आम्ही 2019ला शिवसेनेसोबत सरकार स्थापन केले. तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले. तरीही मी काही बोललो नाही.

अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच शिवसेनेतील अवस्थतेबाबत आम्हाला कुणकुण लागली होती. आम्ही उद्धव ठाकरेंना याकडे लक्ष द्या, असेही सांगितले होते. पण जे व्हायच ते झालच. त्यानंतर आमचे सरकार गेले. त्यानंतर आम्ही सर्व आमदारांनी सह्या करून साहेबांकडे विनंती केली की, आपण सरकारमध्ये जाऊया. आपल्या आमदारांची कामे होत नाहीत. निवडणुकीत आपण लोकांसमोर काय सांगायचे. तेव्हाच एकनाथ शिंदेंचे बंड सुरू होते. तेव्हा एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला नव्हता. मात्र, तेव्हा पुढे जाण्यास आम्हाला रोखले.

Leave A Reply

Your email address will not be published.