बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची मंत्रीपदे धोक्यात

0

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ७ जणांची मंत्रीपदे धोक्यात आली आहेत. आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीवरुन या ७ मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. 

शिवसेनेत नेते पदावर कोण राहत? मंत्री पदावर कोण राहत हे आज संध्याकाळी कळेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. बंडखोर आमदारांमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये आज सहा ठराव करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि ती कायम राहील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर राष्ट्रीय कार्यकारिणीचा विश्वास, पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे उद्धव ठाकरे यांना असतील. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अधिकार देण्यात आले आहेत.

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कोणालाही वापरता येणार नाही, हा महत्वाचा ठराव या बैठकीत करण्यात आलेला आहे. तशी मागणी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील. याशिवाय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेले काम याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी करण्यात आला. असे सहा ठराव या बैठकीत करण्यात आलेले आहेत.

शिवसेनेच्या आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांना अभय देत नेतेपदावर कायम ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय पक्षविरोधी कारवाईमुळे चर्चेत आलेले रामदास कदम यांच्यावरही पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही. एकीकडे बंडखोरांना अभय देताना १६ आमदारांवर अपात्रेतची कारवाई करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र देण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.