कोविड उपचारांसाठी नव्या गाइडलाइन्स जारी

0

नवी दिल्ली: भारतात करोनाची तिसरी लाट धडकल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत आहे. त्याचवेळी दुसऱ्या लाटेच्या तुलनेत स्थिती अजूनही नियंत्रणात आहे. अशावेळी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. करोना बाधित रुग्णांवरील उपचाराबाबत केंद्र सरकारने आधीच्या गाइडलाइन्समध्ये आज महत्त्वाचे बदल केले असून सुधारित गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत स्टेरॉइड्सचा अतीवापर झाला होता. त्यामुळे अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिसचा सामना करावा लागला होता. त्याकडे लक्ष वेधत कोविड टास्क फोर्सचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी नुकतीच चिंता व्यक्त केली होती. करोनाच्या तिसऱ्या लाटेत औषधांचा अती आणि चुकीचा वापर टाळण्याची सूचनाही त्यांनी केली होती. त्यालाच अनुसरून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोविड उपचारांसाठी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या गेल्या आहेत. त्याचवेळी रुग्णांमधील लक्षणांनुसार वर्गवारी करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

सरकारने स्टेरॉइड्स देण्याबाबत डॉक्टरांना अगदी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. स्टेरॉइड्समुळे म्युकरमायकोसिस वा ब्लॅक फंगसचा धोका निर्माण होतो. ती बाब लक्षात घेता गरज नसताना आणि गरज असली तरी अधिक प्रमाणत स्टेरॉइड्स देण्यात येऊ नयेत. सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणे या आधारावर आवश्यकतेनुसार औषधे देण्यात यावीत, असे यात नमूद करण्यात आले आहे. सलग दोन ते तीन आठवडे खोकला थांबत नसेल तर टीबी किंवा अन्य कोणता आजार आहे का याची खातरजमा करण्यासाठी संबंधित चाचण्या करून घ्याव्या, असा सल्लाही यात देण्यात आला आहे.

वेगवेगळ्या लक्षणांबाबत असे आहेत निर्देश…

– श्वास घेताना त्रास होत नसेल, हायपोक्सियासारखी समस्या नसेल व केवळ नाक वाहत असेल आणि घसा खवखवत असेल तर ती सौम्य लक्षणे गृहित धरली जातात. अशा रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, ताप जास्त वाढला किंवा खोकला वाढला तर त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने पुढील उपचार करावे.

– रुग्णाची ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल ९० ते ९३ टक्के यादरम्यान फ्लक्च्युएट होत असेल आणि श्वास घेण्यास अधिक त्रास होत असेल तर ती मध्यम स्वरूपाची लक्षणे मानली जावीत. या रुग्णांनी लगेच रुग्णालयात दाखल व्हावे. या रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टही देण्याची आवश्यकता असेल.

– रुग्णाचा रेस्पिरेटरी रेट प्रति मिनीट ३० पेक्षा अधिक असेल आणि श्वास घेण्यास जास्त त्रास होत असेल व रूममधील ऑक्सिजन सॅच्युरेशन ९० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर असा रुग्ण गंभीर मानला जावा. या रुग्णाला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात यावे. रुग्णाला रेस्पिरेटरी सपोर्ट, एनआयव्ही, फेस मास्क इंटरफेस अशा सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा.

– सौम्य ते गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आपत्कालीन स्थितीत रेमडेसिवीरचा वापर करण्यास अनुमती देण्यात आली आहे. जे रुग्ण घरीच आहेत, ज्यांना ऑक्सिजन लावण्याची गरज भासलेली नाही त्यांना हे औषध दिले जाऊ नये, असेही नमूद करण्यात आले आहे. ६० वर्षांवरील सहव्याधीग्रस्त रुग्णांमध्ये करोनाची गंभीर लक्षणे असतील तर त्यांना अधिक धोका असल्याचेही पुन्हा एकदा नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.